loveforsaree❤.........
परवाच कधीतरी, समारंभाच्या निमित्ताने साडी नेसायची म्हणून कपाटासमोर उभी राहिले....ही नको , ती नको करत ..पोपटी- हिरव्या रंगावर नजर  स्थिरावली...लग्नातली तेलफळाची  साडी... आठवणींची ती साडी बाहेर काढली...आणि  आरश्यात बघत असताना मागून लेकीबाईंचे अनुमोदन मिळाले ..आई तू हीच नेस आज.. मी अजूनही  त्याच्या काठ पदरातच अडकून राहिले होते..परत परत बघताना आठवणींचे पदर उलगडत होते...कित्ती हौसेनं घेतली होती..सगळ्यांना आवडली ...आवडत्या माणसाला तर खूपच..माझा तर हिरवा रंग कित्ती आवडता...
साडी  ..वेगवेगळ्या कारणांनी ,वयाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर , वेगवेगळ्या निमित्ताने  आपल्या जवळ येते आणि ... कित्ती खास होऊन मनात राहते..
...अगदी पाळण्यात असताना   माझ्या अंगावर पांघरलेली आजीच्या साडीची चौघडी .. त्यावेळी कळली असेल नसेल,,  पण  आज जाणवते मात्र नक्की..नंतर आत्यानी कौतुकाने घेतलेलं परकर- पोलकं असो किंवा,छोटीशी कल्पना साडी ...कित्ती हौसेने  नेसवली  गेली,,आज्जी किंवा आईची साडी.. भल्या मोठया निऱ्यांचा बोंगा सावरत जेंव्हा"आप्प्या आप्प्या" च गुंडाळून(कधीकधी
उलटीपण)सगळ्यांसमोर येऊन हौसेनं दाखवताना झालेला आनंद, तसं ध्यान असूनपण त्यात ज्यांना  मी गोडच दिसले त्यांचं हसू  आजपण स्पष्ट आठवतं...
हळदीकुंकू,  सणवार ,  स्नेहसंमेलन, खास मैत्रीणीचं लग्न,,, ह्या आणि अश्या अनेक प्रसंगी बिनदिक्कत आईआजीच्या कपाटातल्या साड्या काबीज करत असतानाच,,एक दिवस कायमची हक्काची साडी नवीन उंबऱ्यापलिकडे  येऊन थांबली,, तिथे मात्र थोडं थबकल्यासारखं  झालं...
सांभाळून घेणाऱ्या पदराचं टोक हातून  सोडलं आणि त्या साडीलाही आपलंसं केलं ,,,, अर्थात विश्वासाच्या मऊ धाग्याची ओळख जुनीच तशी ...पण नव्याने होणार होती..
आणि....loveforsaree❤ continues....
ही आणि अश्या अनेक आठवणींच्या साड्या आल्या ,,, पहिल्या वर्षाचे सणवार ,,, डोहाळजेवण, बारसं ,, दिवाळी,,, दसरा,,भावंडांची लग्न ,,, आठवणींमध्ये भर टाकत राहिल्या ,,,
हळूहळू सोयीच्या नावाखाली ,, आठवणीतली साडी ठेवणीतली होत गेली ...
पण #loveforsaree❤ continues....
छोट्याश्या लेकीला ओढणीची साडी गुंडाळताना, परत एकदा कल्पना साडी नेसवताना,,तिला, उंच माझा झोका मधल्या" रमा "  सारखी नऊवारी  हवी म्हणून माझी साडी छान चापुनचोपून नेसवुन दिलखूष करताना,,, मी  हरखून गेले ,,, कदाचित तिच्याही आठवणींच्या  भरजरी पदराची सुरुवात ठरेल ही,,,, माझ्यासारखीच ,,, हळूहळू शिकेलच सावरायला ,,पण तोपर्यंत  तरी असाच उडता राहू दे...
....आठवणींचा हा असा पसारा आवरला आणि  खणखणीत शिक्कामोर्तब झालेली साडी  नेसायचं नक्की केलं,,,, ओळखीचा हात फिरला बहुतेक तीही  लकाकली .. छान ऐटबाज घड्या करून लफ्फेदार  पदर निघाला ,,  पण छे ...निऱ्या काही मनासारख्या होत नाहीत आज ,,, मनभर पसरलेल्या साडीच्या घोळात आता घड्याळाच्या  न थांबणाऱ्या  चक्राची भर पडली .....
छे बाई आजच काय झालं,,, निऱ्या अगदी म्हणजे अगदी बसत नाहीत..विचार चालूच... आणि मनातलं जाणल्यासारखी ,,  लेक आली ,, आई  थांब,मी मदत करते.. मी बघत राहिले ,,एकेक निरीची छान घडी करत एका बाजूला वळवून  अगदी जाणकारासारखी म्हणली ,, हं, बघ बरं आत्ता झाल्यात का छान...
छोटेसे हात, मान किंचित झुकवलेली  कित्ती गोड विचारत होती,,, कालपर्यंत माझी सगळ्यात  आवडती साडी भसभस  काढून गुंडाळणारी,, आणि जमत नाही म्हणल्यावर तशीच घेऊन ,, तूच कर म्हणणारी  ठमाबाई...आज माझी, "ड्रेपिंग स्टाइलिस्ट"झाली होती...
साडी छान च दिसायला हवी,,,म्हणत तिनं डोळे मिचकावले..
आरश्यासमोर  पुढे ती ,आणि मागे मी एकमेकिंकडे बघून हसलो ...
मी मनातच म्हणलं  ,,, and,,,#loveforsaree,,,continues....❤
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट