मुलीची वार्षिक परीक्षा संपत  आली ,,आणि तिच्या आधी मे महिन्याच्या सुट्टीत मीच जाऊन पोचले ...लेकीची यादी तयार च होती...अगदी कागदावर लिहून  वगैरे....माझी पण ...मनातल्या मनात...हे करू ,ते करू ...पण जशी ही परीक्षा संपण अगदीच   जवळ आलं  तेंव्हा  कॅलेंडर जवळ  बऱ्याचवेळ उभं राहून पानं उलटणे, तारखांवरून बोट फिरवून ,मनातच ठरलं!!!! असे म्हणून खुशीत मान डोलवण ... हे चालू झाल्यावर लग्गेच अहोंचा खास शैलीत प्रश्न आलाच...झाली का सुरू माहेरपणाची आखणी😂...बेत रचून झाला असेल तर घोषणा करून टाका सरकार....
काय तुला अगदी माहेरपण वगैरे लाड करून घ्यावेसे वाटतात गं???  मनासारखं इथेही  सगळं होतं ,राणीचा रुबाब आहे, मानाचा आब आहे ,घराची सर्वेसर्वा तूच...मग   अजून काय  बाकी राहतं की माहेरपणाची बेगमी करून ठेवतेस😁...
मी मनातच म्हणलं.... एका दिवसात ह्या घरातुन ..त्या घरात   जी येते ना तेही ...आता कायमच हं .!!
ह्या  जाणिवेनं..तिलाच कळतं फकत..खूप कौतुकाने बॅगा भरलेल्या असतात ,  हव्या त्या गोष्टी कमी पडू नयेत म्हणून बरोबर दिलेल्या असतात , त्या वस्तू मावतात बॅगेत,,, पण आठवणी नाहीना मनात मावत,,बॅग  उघडून  वस्तू नवीन जागा मिळवतात, पण  आठवणींचं तसे नसत ना..त्या मनातच ठेऊन नवीन अनुभवासाठी जागा करायची असते...तुला कसे कळेल...
म्हणून दरवर्षी परत जाऊन आठवणींना, त्यांची जुनी जागा  पहायची असते, सगळं तसंच तर आहे ,माझं जे इथे होत ते अगदी जसच्या तस आहे ,,तीच खिडकी , तोच कट्टा,  बसायची जागा तीच,नारळाभोवतीचा पार  आंब्याच्या झाडाचं आळं, तुती खाऊन लाल झालेलं  तोंड,तशीच वाळवणं, कुरडया पापड्या परत लहान होऊन राखणीचा आव आणून चोरून खाणं, तेच डबे,त्याच लोणच्याच्या बरण्या तस्सेच दादरे, शिकेकाईचा वास,सकाळी मोगऱ्याचा गजरा ,अंगणातली रांगोळी, त्यासाठीचा वर्षानुवर्षे  ठरवलेला डबा..सग्गळ जस्सच्या तस्स बघून ,काय वाटत हे तुला कसे कळेल😇
गावाकडच्या घरांमध्ये, किंवा आई आज्जीचा अनुभवी हात वर्षानुवर्षे एकाच परिघातून फिरत आलाय , त्या घरांमध्ये  रोजच्या साध्या  गोष्टींमध्ये न झालेला बदल किती छान वाटतो..एरवी बदलाचं हवंहवंसं वाटणं मात्र इथे विरून जातं... इथले चहासाखरेचे डबे, त्यांच्या जागा, हक्काने आजीची नऊवारी घेण्यासाठी त्याची न बदललेली जागा, माझी उशी, माझी गोधडी,   काही काहीच बदललेलं नसावं...असे किती वाटत राहतं
...हल्ली  काळानुसार  ,गरजेनुसार थोडंफार बदलतय,लहानाची मोठ्ठी झाले त्या कॉलनीत  झालेले बदल, सोसायटीच्या हॉल च्या जागी इमारत,अगदी ओळखीचं  गुलमोहराचे झाड त्याजागी न दिसणं, शेजारधर्माच्या पलीकडे जाऊन आपलेपणा राखणारी माणसं, त्यांचं  जाणवणारं वाढतं वय आणि एकदम मधेच अचानक  कोणाचतरी गळणं, हे किती चटका लावून जातं ... कसे कळेल???
मला आठवतंय साताऱ्यात असताना  सासरहून   माहेरी  भुर्रकन   मी आले  की कॉलनीतल्या सगळ्या आज्जी ,काकू ,मायेन विचारायच्या काय ग आलीस का माहेरपणाला...मला तेंव्हा विशेष वाटायचं नाही त्यात काय एकाच गावात तर आहे ...आत्ता म्हणलं तरी येईन...आणि मी हसायची..त्या म्हणायच्या यावं गं , चार दिवस निवांत...आता  मात्र समजतंय त्यांचं म्हणणं... त्यांच्याही डोळ्यात अजूनपण आम्ही मुली तश्याच  आहोत ना , हे सगळं हवंहवंसं वाटणाऱ्या, आठवणाऱ्या हे बघायची इच्छा दिसते आता मला...
घरी तर कौतुकाचा वर्षाव असतोच,पण माझ्यासाठी माहेर फकत आईच घर नाहीये,, माझ्या सगळ्या आठवणींची  बेरीज करणारं ठिकाण आहे...
मला दरवर्षी वेध लागतात ..माहेरी जाण्याचे तस्संच आजीचं मागच्या दारातून या म्हणणं,पायावर  पाणी घालून आत घेणं, आईचं मागे उभच असणं, आजोबांचं आल्या का नातीबाई???असे विचारणं... रोज नवऱ्याची वाट बघत असतांना आज मात्र परत ...बाबा कधी येणार म्हणून सारख गेटकडे बघणं, .  ठरलेल्या ठिकाणी बॅग ठेवणं ...  आता मात्र ती दिसणार नाही अशी कोपऱ्यात सरकवून द्यावीशी वाटते.. कारण ती जाणीव करून देते ना परत जाण्याची...जायचं तर आहेच पण तोपर्यन्तच्या सुखात ...ती...नकोच!! कोणाच्या तरी  नसण्याची कमी , आठवण  हे सगळंं गोळा करायचं असत तिथेच जाऊन...हे वाटणे तुला कसे कळेल???
 मागच्या वर्षी समोरच्या आज्जी म्हणल्या ,तुम्हाला पोरींना हल्ली वेळ कुठंय,, आल्या आल्या म्हणेपर्यन्त निघून पण जाता , आठवतं का ग तुम्हाला तुमची भातुकली किती रंगायची मागच्या अंगणात ...चिंचेचं लॉलीपॉप , दाणे गूळ ,छोटीशी खरी खरी चूल त्यावर चिंचेची पान पाण्यात  उकळून केलेला चहा...काय मजा यायची ...  या ग परत मला अज्जूनही आवडत भातुकली खेळायला ..आठवतंय ना
मी म्हण लं आज्जी फकत हेच तर आठवतंय, परत तोच खेळ लहान होऊन ..वा .😊नक्की खेळू...
हे प्रेम , ही जाणीव , हे अगत्य, कौतुक, जिथे आहे ना तेच माझं  माहेर आहे , आणि हे असं आहे तोपर्यन्त कितीही बदल झाला तरी थबकायच कारण नाही ...तिथेच काही गोष्टी थांबल्या तरी जिवंतपणा आहे , काही गोष्टी बदलल्या तरी पूर्वीचाच ठसा आहे ...
ठरलं !!!!ठरलं!!! जायचंय आता माहेरपणासाठी.. नक्की जायचं ...वाट बघतेय😇.....

आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट