संध्याकाळच्या रामरक्षा आणि शुभंकरोती चा नेम (आईसाठी का होईना)पार पाडल्यावर  आमच्या बाळाबाई  रिमोट घेऊन बटन दाबण्याच्या तयारीत असता....,
चैत्रा ,,,लगेच टीव्ही ,, अग शुद्धलेखन वगैरे नाही का काही तुला ,असे म्हणून,तिच्यालेखी तिच्या बेताचा विचका केला आणि  माझ्यालेखी  अभ्यासासाठी मागे लागण्याचे खास आईचे आद्य कर्तव्य  बजावले.सध्या तरी आईचे ऐकण्याच्या वयात असल्यामुळे बाईसाहेब लगेच कुरकुरत का होईना शुद्धलेखन लिहायला बसल्या🤓
आज मी मनानेच लिहिते असे "डिकलिअर"करून,म्हणजे आता तुझी लुडबुड नको असे सुचवून नाक उडवत लेकीबाई लिहायला बसल्या.
१० मिनिटात माझ्यासमोर वही फडफडवत म्हणली बघ मी कसे लिहिलंय ....एवढ्या लवकर झालं पण म्हणून मी अगदी मनोमन खुश होऊन वही बघितली ....
आणि,,, मुलांचे मानसशास्त्र , सुजाण पालकत्व, अभ्यासाचा ससेमिरा ,विभक्त  कुटुंब पद्धतीत मुले आणि त्यांचे प्रश्न ...ही असली  प्रश्नांची वावटळ जी सध्या माझ्या वयाच्या सर्व आयांमध्ये कमी अधिक प्रमाणात उठत असते, क्षणार्धात डोळ्यासमोरून भिरभिरून गेली आणि  त्याला सहज छेद देऊन ती भिरकावून कशी  देऊ ह्याच उत्तर माझ्या हातात आलं...
चैत्राने शुद्धलेखनाचा विषय घेतला होता माझ्या  पणज्या😍...साध्याच ओळी, तिला जमेल तसे पण त्यात  एक गोष्ट खूप खास होती,तिने अनुभवलेलं प्रेम ,कौतुक आणि आठवण येत असताना सहज ते लिहून काढू हा त्यावरचा मार्ग..
विचारांचा उहापोह नाही, चर्चा नाही,  फकत व्यक्त होणं ...किती सहज उपाय आहे .प्रेम ,माया ,जिव्हाळा माणसाला सगळे शिकवते ,शहाणं करतं ,हि वाक्य वाचण्यापेक्षा  अशी हातात  बघणं किती छान आहे काय सांगू ....
...आई मी कसे लिहिलंय ...ह्या तिच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तरच नव्हते उलट मलाच उत्तर मिळत होतं... त्यांनी केलेला प्रेम असे रुजलंय इथपर्यन्त आणि हाच तर दुवा आहे आमच्या कुटुंबाचा ,नोकरी निमित्त लांब असलो तरी जवळच असण्याचा...आणि हे असं सगळं आहे तर ती मोठ्ठी होताना मला खूप दडपण घेण्याचं कारण नाहीये...
 अर्थात हे सगळे  मोबाईल वरून आपल्या पणज्यांपर्यंत पोचवण्याची ,ते एनलार्ज करून कसे बघायचे हे सांगण्याची जबाबदारी तिने तत्क्षणी पार पाडली हे सांगायला नको..त्यायोगे आईची जराशी तक्रार पण सुप्रीम कोर्टात  पोचवली गेली😁,आणि सरतेशेवटी माझ्या हातात फोन आला तेंव्हा  माझ्या सर्व आज्यानी मला ,नको ग रागावू  ,लहान आहे, पोरगी करतेय  तरी तुम्ही करत होतात का??  हे ऐकवले ...माझी सपशेल शरणागती...विजयी मुद्रेने लेकीबाईंनी फोन घेतला आणि उर्वरित बोलायला लागल्या ....
लेखी मराठी  भाषा अजून शुद्ध ,स्पष्ट नसेल कदाचित पण प्रेमाची ,ओढीची  भाषा मात्र विशुद्ध आहे ..एका छोट्याश्या प्रसंगाने माझे सगळे घर जवळ भासवणाऱ्या माझ्या लेकीकडे मी बघत राहिले पणज्यांचाआणि  त्यांच्या बासुंदीचा तो सुखाचा संवाद पण न्हाहात  होते मात्र मीच ...त्यांची दुधावरची साय😊

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट