कोयरी
#कोयरी 💛❤️
पळी -पंचपात्र, तबक, ताम्हण, निरांजन, गंधाची छाटी, उदबत्ती घर...सगळं अपर्णा ने घासून कसं लखलखित करून ठेवलं होतं...
उद्या हरितालिकांची पूजा,, आणि पाठोपाठ गौरी -गणपती आलेच की...आनंदोत्सव ...उत्साहाचं नुसतं उधाण..
तिने मनापासून एकदा, सगळी उपकरणी बघून घेतली...त्यांच्यावर खुशीनं हात फिरवून , ती देवाजवळ दिवा लावायला उठली.
दिव्याची वात सरकवून काजळी दूर करून,, तिने दिवा लावला... देवासमोर हात जोडले..
ये हं लवकर,,, गौरा बाई तुम्ही पण ,, वाट बघतेय मी..
बघतोयस ना देवा, सगळं घर लगबगीने भरून गेलंय,, कित्ती तयारी चाललीय..किती करू आणि किती नको अस झालंय,,, तू येण्याची ही चाहूल,, ही तयारी, हा उत्साह, जागरणं...ह्यातच किती सुख आहे..माहितीय तुला??आणि मनाशीच हसली...तुला तर सगळंच माहितीय...
दिवसभराच्या धावपळीत,, त्या सात्विक प्रकाशात, उत्साही तरीही शांत वेळेतला तिचा फकत " त्याच्याशी" संवाद...रोजच्यासारखा च,,पण आज लौक्कर येण्याविषयी आर्जवं ही होती.
सवयीने हळद कुंकू वाहीलं आणि कोयरी जागेवर ठेवताना,, मात्र ती, तिच्याकडे बघत राहिली,, हात फिरवून फिरवून..परत परत....
तिला आजीची आठवण आली.. संध्याकाळी,, देवघरात, तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावताना शुभंकरोती-रामरक्षेचे स्वर,, उदबत्तीचा दरवळ,, पाटावर तिचं बसणं,, मनात आता त्याच दिवसांनीच फेर धरला.
देवघरात, आदित्यराणुबाई,, शुक्रवारची महालक्ष्मीची, त्रिपुरी पौर्णिमा..नवरात्र, गणपती, अश्या अनेक सण- समारंभ ,,,पूजा ह्यावेळी,, हीच कोयरी वापरायची ती.
तिची निमुळती बोटं ,, ह्या कोयरीत बुडताना ,, आणि बाहेर निघताना,चिमटीत असलेल्या हळद- कुंकवा ने भरून गेलेली तिची बोटं.. पाटल्या-बांगड्या असलेला तिचा हात, ती बोटं कपाळावर टेकवणारी...आणि नंतर त्याच माखलेल्या बोटांनी डोळे मिटून नमस्कार करणारी आजी ... इतकं प्रकर्षाने आठवलं तिला सगळं...की जशी ती, अगदी , इथेच मागे बसून ,, कौतुकाने बघत, हसून विचारतेय...आठवतंय का??
ही दिवेलागणीची वेळ,, तिचा भास,,, ही कोयरी...आणि क्षणार्धात मिळणारी शांतता ...ह्या वेळेशी काहीतरी समीकरण नक्की आहे .
तिच्या सुरकुतलेल्या हातावरच्या शीरा,, हात लावला की मऊ लागायच्या... त्यावर हात फिरवत मी विचारलं होतं.. ही कैरी किती ग छान आहे...मला देशील का??
तू हसून म्हणालीस..कैरी नाही ग ...कोयरी आहे ती हळद-कुंकवाची..तु जेंव्हा खरचच मोठी होशील तेंव्हा तुलाच देईन हं मी..काही गोष्टींची किंमत समजली..महत्व कळलं की त्या जीवापाड जपल्या जातात...आणि अश्या गोष्टी आपण मिळवायच्या असतात..तू मिळवशील च ही कोयरी माझ्याकडून..तुझीच होईल ही ..😊
त्यावेळी काही कळलं नाही,, पण ही माझीच...हे पक्कं झालं...
एकेक लड हळूच उलगडत जावी, तसे अपर्णाच्या मनात,,, स्मृतींचे पदर..
मनात ,,घननीळ श्रावण बहरला होता त्या दिवसात...
गोकर्णाची फुलं तोडून परडीत ठेवत होते. तू मागून आलीस,, खांद्यावर हात ठेवलास, आणि म्हणालीस... उद्या हरितालिकेची पूजा-उपास करायचा तू आमच्या सगळ्यांबरोबर...मला माहितीय,, ह्यावेळी जास्तच मनापासून करशील...
मी बघतच राहिले...तुला कसं....???
पुढे जाताना,, मागे वळून म्हणालीस...आणि हो,,, त्याच नांव सांगितलंस मला, तरी चालेल आता...
त्याच संध्याकाळी.. मी"अभिराम" बद्दल सगळं सांगितलं होतं....
कुटुंब ओळखीचंच तोही बघण्यातला ... मी अपेक्षेने बघितलं...
गणपती गौरी होऊ दे ,, बोलू आपण..इतकंच म्हणालीस.
दुसऱ्या दिवशी हरितालिकांची पूजा, पत्री-फुलं, गेजावस्त्र,,केळीचे खुंट ,कहाणी,, सजावट,, तो उदबत्ती -धुपाचा वास. आजही आठवतं
"केली बहु उपोषणे...शम्भू भ्रताराकारणे"...
खरचच का गं.. ही पूजा केली की मनासारखा नवरा मिळतो??मी विचारलं ..
अप्पू.. खरं सांगू??मनातली तीव्र इच्छा ही खरी...
ह्या पूजेचंच म्हणशील...तर,,
आपल्याला मनाप्रमाणे संसारात सोबत मिळावी,, त्यासाठी,,स्वतःचा कस लावून आपण काही करणं... स्वतःच स्वतःला पारखणं...आपण केलेली निवड योग्य आहे,,ह्यावर विश्वास ठेवून त्यासाठी तोशीस लावून घेणं...ह्या सगळ्याने काय होतं??पुढच्या प्रवासात ह्याच दृढतेने ,आलेली प्रत्येक अडचण तारून नेऊन सोबत भक्कम राहण्याची शाश्वती मिळते...कारण जेंव्हा एखादी गोष्ट कष्टाने मिळवतो,, तेंव्हा टिकवण्यासाठी हरतर्हेनें प्रयत्न केले जातात,, त्याचवेळी त्याची किंमत राहते..
आता हे फकत ,, आपण बायकांनीच करायचं का??म्हणशील..तर योग्य निवड असली की,,नात्यात मीच का??कोण किती करतं... हे प्रश्नच पडू नयेत..अशीच ती सोबत सार्थ ठरते. परस्परांसाठी केलं जातं... आणि वाटचाल होते. योग्यता-विश्वास आणि त्यासाठी असीम प्रयत्न...हेच तर आहे ह्यात.
म्हणलं तर व्रत..म्हणली तर श्रद्धा...आणि म्हणलं तर तत्व...आपल्याला पटेल तस करावं...काय???
आमचं लग्न झालं...थोडे चढ-उतार..कधी हिरमुसण्याचे प्रसंग...कधी दुखावलं जाण्याचे.. काठोकाठ आनंदाचे-सुखाचे, कधी..खम्बीर राहण्याचे... खूपसे
तू सांगितलेलं मी कधीच विसरले नाही आजी...
माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली,, आमचं स्वतःच घर झालं...देव्हारा स्वतःच घ्यायचा नाही,, म्हणून तोही तू दिलास.. आणि कुंकू लावून हि कोयरी हातात ठेवलीस...म्हणालीस,,आजपासून ही तुझी...
कारण तुला आता कष्टाने मिळवणं,, ते टिकवणं,, वाढवणं,, आणि राखणं... सगळंच उमजायला लागलंय... तू हि मिळवलीस माझ्याकडून... आता ह्या कोयरीचं,, आतल्या हळद-कुंकवाचं महत्व आणि अर्थ दोन्ही तू सांभाळशील.. माहितीय मला😊
......
अपर्णा,त्या कोयरीवरून हात फिरवत म्हणाली.. आजी,,, उद्या दरवर्षी सारखीच मी हरितालिकांची पूजा करणार आहे,,, मला सगळंच आठवतंय... अगदी सगळं...
खरचंच काही वस्तू...फकत वस्तू नसतात..आठवणी असतात.
आरती जोशी-ऋचा प्रभुणे
Comments
Post a Comment