चन्द्र_आहे_साक्षीला
#चन्द्र_आहे_साक्षीला
शरद रावांचं सहस्त्रचन्द्र दर्शन करण्याचा ठराव कुटुंबात अर्थातच, एकमताने झाला,, तेंव्हाच शरद रावांनी अट घातली,हा कार्यक्रम आप्तेष्टांच्या सहवासात,, छोटेखानीच करायचा....मुहूर्त ही त्यांनीच ठरवला,, शुभवेळ बघण्याची गरजच नव्हती...
कोजागिरी पौर्णिमा..
संध्याकाळी ,, गच्चीत,, गप्पागोष्टींच्या साथीत अनौपचारिक सोहळा.
ठरलं...अगदी नक्की.. असंच होणार... शरद रावांच्या मनासारखं...
उत्साहाच्या, ठरवाठरवी च्या लाटेवर स्वार दिवस,, झुळके सरशी निघून गेले,,, आणि तो दिवस उजाडला..
शरदराव अगदी वाट बघत होते,,, दिवसापेक्षा,, संध्याकाळची,, आणि त्यामागोमाग येणाऱ्या पौर्णिमेची...पूर्ण चंद्राची रात्र..
त्या दिवशी ते सतत कपाटाजवळ जाऊन चाचपणी करत असल्याचं श्यामल ताईंच्या नजरेतून निसटलं नव्हतं...
काय चाललंय??ह्या भुवयांनी विचारलेल्या प्रश्नाला,, कुठे काय??काहीच नाही,, हे उत्तर डोळे मिचकावून मिळालं होतं..
आणि ती वेळ आलीच,,, मुलं-बाळं ,, नातवंड-पतवंड बहिणी, जावई, साडु-मेव्हणे ह्यांनी भरलेलं घर,,,,आणि,,, शरदरावांनी श्यामल ताईंना हाक मारली,, अहो,, मंडळी,, जरा इकडे,, खोलीत या बघू,, आणि तुम्ही च या फकत...
त्या खोलीत आल्या,, शरद रावांनी त्यांच्या हातात एक पिशवी ठेवली,,, बघ , आवडेल तुला,,, काहीश्या आश्चर्याने,, ताईंनी पिशवी उघडली,,त्यात होती ,,गर्द हिरव्या काठाची ,, सोनसळी किनार असलेली काळी पैठणी ...
पैठणी??काळी पैठणी?अहो, मला....काळी पैठणी हो कश्याला?? काय हे??शोभेल का तरी आज ???
आणि आज तुमचा, दिवस आहे,, मला हो कश्याला....
त्यांना पुढचं काहीही बोलू न देता,,शरद राव म्हणाले,,
म्हणूनच,,, माझ्याच साठी ,, आणलीय तुला..
श्यामल,,मला आठवतंय,,,आपल्या लग्नानंतरची पहिलीच कोजागिरी पौर्णिमा होती,,पांढऱ्या खडीची काळी चंद्रकळा नेसली होतीस तू.. सगळे जमले होते...
दुधाचं पातेलं घेऊन जाताना,, आक्का तुला म्हणली,, ही साडी सोड हो,,, दुसरी नेस,,, काळी,, साडी तुला काय शोभून दिसणार???
आसवं जमून आलेल्या डोळ्यांना तू दटावलंस,,, आणि हसण्या खाली झाकून नेलंस ,, त्यावेळी उघडपणे बोललो नाही, पण माझ्या मनात मात्र ते बोलणं घर करून राहिलं...
गोऱ्या-घाऱ्या माझ्याशी,, तुझ्या सावळ्या रंगांचा जोड,, खूप जणांना विसंगत वाटला.. करून घेतली...पदरात पडली...अशी बोलणी,, कायमच तू ऐकून घेतलीस,, पण तुझे गुण, वागणं,, सगळ्यांना सांभाळून घेणं,, ह्याचं चांदणं कोणी कधी पारखलं च नाही... आज त्यावेळचं बोल लावणारं,,,कोणीच नाही,, पण तू त्यावेळी काळी साडी नेसायचं मागे सारलंस ते मात्र तसंच आहे तो काळही वेगळा होता आणि ती वेळही वेगळी होती..
आज हे सहस्त्रचन्द्र दर्शन...आपल्या आयुष्यातील पूर्णत्वाची परमावधी...आज काहीच राहून जायला नको..
हा चन्द्र प्रत्येकाला नवा दिसतो,,, प्रत्येकासाठी नवा असतो,, असं म्हणतात... आपल्या कृतार्थ, परिपक्व,आयुष्याचं बिंब बघायचं आता आपण ह्या चंद्रात... एकत्र...
पौर्णिमेचा ,, पूर्ण चंद्र काळ्या रात्रीत च जास्त खुलून दिसतो.. आता किल्मिश काहीच नाही,, सल ही राहायला नको.
चुकभुल देत घेत इथवर आलो आपण...आयुष्याचे सगळे टप्पे पार केले..
त्या काळ्या डागासह,,, सम्पूर्ण तेजस्वी दिसणाऱ्या चंद्राचा अर्थ आपल्या शिवाय अजून कोणाला जास्त उमगणार???
मोड घडी,, ये नेसून,,, वाट बघतो....चंद्राची...
दोघांच्या ही चेहऱ्यावर,, चांदणं पसरलं होतं... आणि
कोजागिरीचा चन्द्र म्हणत होता...
जीवेत शरद:शतम्...पश्येम शरद: शतम्...
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.
फोटो सौजन्य: साभार गुगल
Comments
Post a Comment