शारदा

#शारदा

रेवती आठवडाभर पाहत होती...सारजा बाई ..तिच्या सासूबाई नेहमीपेक्षा उत्साही वाटत होत्या..अगदी मागच्या १०-१५ दिवसांपर्यंत,"कुठे जायचंय आता घाईने,, सगळे तर घरातूनच कामं करताय....आवरते निवांत"म्हणणाऱ्या...त्या सकाळी लगबगीने आवरून घेत होत्या..ठराविक वेळी हातात असणारी,जपमाळ सुद्धा क्वचित दिसत होती.
तसं, त्यांनी योग्य वेळी वयोमानानुसार, कोठीच्या किल्ल्या  रेवतीकडे दिल्या होत्या,, तीही त्यांच्या विश्वासाला पात्रच ठरत होती,, सगळं घर जबाबदारी घेऊन उत्तम चालवत होती..
सारजाबाईंचा मुलगा जयंत..त्यांचा "राया" पुष्कळ शिकून,,  त्यांच्या भाषेत,, मोठ्ठा साहेब झाला होता.
आईने आयुष्यभर उपसलेल्या कष्टाची  जाणीव जयंत ठेऊन होता.रेवती देखील त्यांना दुखावत नव्हती.
सारजाबाईं, जयंत-रेवती आणि त्यांची मुलगी ओवी. छान फुलोरा  नांदत होता.
"देता देवविता नेता नेवविता मनुष्याची सत्ता काय येथे"
ह्याप्रमाणे सारजाबाई जे गेलं,, ते गेलं.. त्याची खन्त न करता,, जे आत्ता आहे त्या भाग्याच्या सुखात राहत होत्या.
ह्यावर्षी...बाहेरच्या परिस्थितीमुळे,, ओवीची शाळा ऑनलाइन  होणार होती... पुस्तकांची जमवाजमव..काळजी घेऊन केलेली आवश्यक सामानाची खरेदी.., ऑनलाइन शाळा नक्की कशी असेल...ह्या सगळ्या उहापोहात.. एकदा ती ऑनलाइन शाळा सुरू झाली.
लॅपटॉप,  कधी ब्लु टूथ स्पीकर कधी हेडफोन, स्थिर कनेक्टिव्हिटी,,ही नव्या प्रकारची धामधूम सांभाळत, ह्या  अश्या शाळेचं पण बस्तान  बसलं होतं...
सारजाबाई ,,,,,ओवी बसत होती,, त्याच खोलीत , त्यांच्या नेहमीच्या लाकडी खुर्चीवर बसून...ही अप्रुपाची शाळा बघत होत्या.
आजी हे बघ इथून माझ्या बाई दिसणार,, त्या शिकवणार मला इथे ऐकू येणार,  आम्ही कोणकोण आहोत हे बाईंना इथे दिसणार...शाळे सारखंच,, पण थोडे दिवस आपल्या आपल्या घरातून शिकायचं,, ओवी सांगत होती...सारजाबाई  पण कुतूहलाने सग्गळ
बघत होत्या.
मी बसू ??इथे च...मीही बघते तुझी शाळा...चालेल?? त्यांनी ओवीला विचारलं...
हो बस की,,, फकत  व्हिडीओ मध्ये दिसू नको हं,,बाई विचारतील,, आपल्या वर्गात आज्जी कशी?? ओवी हसत हसत म्हणाली...
आणि तेंव्हापासूनच,, सारजाबाईंची ही लगबग  चालू झाली होती...
आज तुझ्या त्या मराठी च्या  बाईंचा तास नाही  का??
त्यांचा प्रश्न,, रेवतीच्या कानावर पडला,,,  सगळं ठीक ठाक चाललय ना...म्हणून अधूनमधून ओवीच्या"शाळेच्या" खोलीत  डोकावणाऱ्या रेवतीला,,, काहीतरी लक्षात येत  होतं,, सारजाबाईंच्या खुर्चीची हळूहळू  बदलणारी ,, जागा ही....
 आज बोलेन दुपारी,, अस ठरवून , ती कामाला लागली,, दुपारी  सास्वा-सुनांच्या चहा घेता घेता गप्पा चालल्या होत्या,,,
तिने विचारलं,, "माई,  हा शाळेचा प्रकार कसाय ना?? आत्ता आत्तापर्यंत असलं काही नव्हतं की नाही"
त्या म्हणाल्या,,, अग बाई,,, आमच्या वेळी शाळा पण कशी बशी च होती,, शाळेचेच आठव पुसट आहेत माझे...
सात भावंड आम्ही,, बेताची परिस्थिती,, कशी तरी चौथी पर्यंत शाळा झाली... बापूंना ..आमच्या वडिलांना इच्छा खूप होती ग,, पण परिस्थितीपुढे कुठे काय चालतंय,,,  मी,, आमच्या वर्गात हुशार होते,, जोडाक्षरं, पाढे,  गणितं,, चित्र सगळ्यात पुढे,, आमच्या मराठीच्या बाई,, खूप आवडायच्या मला...सगळ्या कविता ,, इतकंच काय धडे सुद्धा पाठ असायचे माझे...पण अक्षरओळख होऊन ,, शाळेची गोडी लागते  तोच बापू गेले,, आणि नंतर सगळं चक्र च फिरलं बायो,,
जसं, जेंव्हा, जे मिळेल ते वाचत राहिले,, अक्षरांची ओळख तेवढी शाबूत राहिली,,,
इकडे  सासरी,, तर,, हाssss  धबडगा...कसल शिकणं नि कसलं काय....छोटं गाव, लवकर अंगावर पडलेली जबाबदारी, ह्यांचं लहरी -तापट वागणं,,, शेतीतलं नुकसान,,, जप्ती,, सगळं विस्कटलं...
ह्या फेऱ्यातून डोकं वरच निघालं नाही कधी,,
झालं,, आता ते...जुने दिवस..
हा माझा धाकटा,, राया मात्र  भरपूर शिकला,,, पुष्कळ कष्ट घेतलेन्  त्याने,  अर्धवेळ नोकरी,, शिकवण्या सगळं करून...तेवढं मात्र पुण्य माझं,, माझ्या हातच्या कामाला हे फळ आलं.
आता ओवीच्या शेजारी बसून वर्गात  गेल्याचा आनंद घेते,, तिचा गणवेश बघताना,,, माझ्या मनातला गर्द निळा गणवेश हालत नाही अजून.
तिच्या कोऱ्या पुस्तकांचा वास,, रंगीत चित्र,, बाईंचं शिकवणं,,, प्रश्न विचारणं,,
नादच लागलाय म्हणेंनास का,, हे सगळं बघण्याचा...
रेवती,, बघत राहिली,, काहीतरी ठरवून ती  उठली.
दुसऱ्या दिवशी,, ओवीचा पहिला तास भूगोलाचा,,
वातावरण..प्राणवायू,,ओझोन चा थर,, सारजा बाई ऐकत होत्या,,
आता दुसरा तास मराठीचा होता..
मधल्या  मिळणाऱ्या थोड्या अवकाशात...रेवती खोलीत आली,,
माई ,, उठा......
सारजाबाई बघत राहिल्या,, आजवर इतकी अधिकारवाणी कधी रेवतीकडून आली नाही,, त्या नकळत  उठल्या...रेवतीने,,, त्यांची बाजूला असलेली खुर्ची बरोब्बर,, ओवीच्या थोडी शी मागे पण स्क्रीन च्या समोर ठेवली...आणि म्हणाली,
माई  आता बसा,, तुम्ही तुमच्या वर्गात आहात😊
मी बाईंशी बोललेय,,, घरी ह्या प्रकारे शाळा असेपर्यंत तुम्ही  अस बसू शकता.
अहो परवानगी मागण्याचा प्रश्नच आला नाही,,तुमची ह्या वयात,, सुद्धा असलेली,, शिकायची आवड  कळल्यावर,,त्यांना खूप आनंद झाला.
सारजाबाई भरलेले डोळे पुसून बसल्या,, मराठीचा तास सुरू झाला...
बाई शिकवत होत्या,,,,

हवेवरी त्या स्वार होत मी
अवकाशी विहरावे...
मनात माझ्या नेहमी येते
मी पक्षी व्हावे....
धुक्यापरी अलगद अलगद
धरणीवर उतरावे
अवघे जग झाकूनि तयाला
मिश्किलतेने पहावे.....
आता प्रश्नांची वेळ,, कवयित्रीला काय काय व्हावे असे वाटते??
सारजाबाईंनी नकळत उत्तरासाठी बोट वर केलं...
आणि बाई म्हणाल्या,, आपल्या  ह्या तासासाठी आपल्याबरोबर, एक विशेष विद्यार्थिनी आहे..ओवीची आज्जी...शारदा आज्जी ,, त्या उत्तर  देणार आहेत..
शारदा....स्वतःचच  नाव,,इतक्या वर्षांनी परत ऐकून,,आनंदाचे डोह झाले....उत्तर देताना,,,निळा गणवेश,, लाल रिबिनी,, स्पष्ट दिसत होत्या.
खोलीच्या बाहेरून जयंत-रेवती,,, बघत होते...
आईचं मन ओळखणाऱ्या बायको कडे बघून जयंताचा,,,
आजी आता वर्गमैत्रीण झाल्यामुळे ओवीचा
चेहरा आनंदाने फुलला होता..
आनंदाचा हा फुलोरा खरचच निखालस फुलत होता
रेवतीने मराठीच्या बाईंना मेसेज केला....
धन्यवाद, हा शब्द अपुरा आहे,,, काही गोष्टींचा मोबदला हा पैश्यानी चुकता करता येत नाही..आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीची वेळ नसते...
#अडचणीतून_मार्ग_म्हणून_केलेली_प्रत्येक_गोष्ट_एक_नवीन_सुरुवात_करते...
ह्या ऑनलाइन शाळेने,,कैक वर्षांपूर्वी " सारजा "मध्ये हरवलेली शारदा तिची तिलाच परत मिळालीय. खूप खूप आभार.

आरती जोशी-ऋचा प्रभुणे.
फोटो सौजन्य:गुगल

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट