अपूर्णत्वातलं पूर्णत्व

 अपूर्णत्वातलं पूर्णत्व
'तिची' लेक आज सगळा थाट करून पहिल्यांदाच "स्टेज" वर  आली होती,,कित्ती सुरेख शोभत होती, अगदी नजर हटू नये इतकी,, अगदी मधोमध उभी,रंगमंचावरच्या प्रखर प्रकाशझोतात ती तर उठून दिसतच होती,, आणि तिच्या चेहरयावरचे शोधक भाव ही,,,
प्रेक्षकांमध्ये 'ती 'ही बसली होती,अगदी  ह्याच क्षणाची वाट बघितल्यासारखी,, जे तीचं स्वप्न ,स्वप्नच राहीलं होत,, आणि  ह्या तिच्या लेकीच्या बाबतीत मात्र कल्पनेत न राहता प्रत्यक्ष रूप घेत होत,,,ते पुन्हा एकदा आसुसून जगत होती.कार्यक्रम सुरू झाला,, देखणा पदन्यास, आत्मविश्वासपूर्वक हालचाली,लहान चेहरयावर, वयाला साजेसेच,पण कळते विभ्रम,, आणि ताईच्या डोळ्यातलं कौतुक,,, हे सगळं बघून हरखून गेली,,, 'ती'
कार्यक्रम सम्पला,, टाळ्यांचा गजर झाला,ही  देखील टाळ्या वाजवत होती,,, जश्या सगळ्यांच्या आवाजात फकत हिच्या आणि हिच्याच टाळ्या  ऐकू जाव्यात इतक्या आवेशाने,,, 'तिला'  घरच्यांचा उद्वेग आठवला,,, ते म्हणायचे तसं,,,,आयुष्य गेलं असतं असंच टाळ्या वाजवत जगण्यात,, योग्य वेळी दिशा मिळाली, आपल्या सारख्यांना अभावानेच  मिळणारा मदतीचा हात मिळाला,केलेल्या प्रयत्नांना यश  आलं, ओळख निर्माण झाली, किमान इतकी तरी की ,लोकांच्या हिणकस नजरांचं काही वाटेनास झालं,,
तिकडे , घुंगरू सोडताना लेकीच्या  मनात आलं,,
मला अम्मा भेटली बरं झालं,,कुठे असेल माझी खरी आई??माहिती नाही.आजूबाजूच्यांच्या  बोलण्या बोलण्यातून कळलं तरी मी  नको  म्हणून,,,,,,जन्मतःच सोडून दिलं मला, अम्मा नसती तर आज कुठे असते कोण जाणे,,इतकं कौतुकाने कोण करेल?तिच्यासारखं जीवाचं  रान करून???
भरभर आवरून लेक बाहेर आली,,शोधत शोधत थेट तिच्याजवळ  जाऊन म्हणली ,, कसं वाटलं??मी कस केलं??तुला आवडलं???
कौतुक न मावणार्या डोळ्यांनी बघत ,, ती म्हणली ,, बेस्स, एकदम, मंग लेक कोणाची  हाये??चल घरी जाऊ आता..
दोघीही एकेकाळी समाजाने नाकारलेल्या, संघर्ष दोघींच्याही पाचवीला च पुजलेला,, दोघींचं बाई असणं वेगवेगळ्या कारणांसाठी नाकारलं गेलेलं,,, पण त्या दोघीनी मिळून आख्या जगाकडे पाठ फिरवली आणि स्वतःच जग वसवलं ,,,, तिथे फकत माया होती. बोचऱ्या नजरा, प्रश्नार्थक चेहरे , कधी कणव, कधी कुतूहल,, ह्या सगळ्यामुळे सर्वसामान्य आयुष्याची संकल्पना भले अपूर्ण होती ,, पण त्या दोघींचं एकमेकींसाठी असलेलं अनोखं पूर्णत्व बघून  ती आयुष्यं असामान्य वाटावी इतकी उजळून निघत होती.
@आरती जोशी-ऋचा प्रभुणे


Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट